इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा बिगुल वाजण्याआधीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण आणि गट सोडतीनंतर प्रत्येक राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांमध्ये हालचाल वेगाने सुरू झाली आहे. सर्वांचे लक्ष आता “आचारसंहिता कधी लागू होते?” याकडे लागले आहे.
अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गटांमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली असून, कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदवारांचा उत्साह तर अनुभवी मुरब्ब्यांमध्ये चाचपणीचे राजकारण सुरू आहे. काही गावांमध्ये तर चर्चा, अंदाज, युतीची गणिते आणि बंडखोरीची शक्यता यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
इंदापूर तालुक्यातील काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या गटात प्रत्येक गावात इच्छुक उमेदवारांची संख्याच वाढली असून, कुणाला तिकिट मिळणार आणि कुणाला नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
राजकीय समीकरणांची रंगलेली चर्चा, गावोगाव सुरू असलेल्या बैठका, सोशल मीडियावरील हालचाली आणि लोकांच्या चर्चेमुळे या गटातील निवडणुकीची चुरस वाढली आहे. कोणत्या पक्षात युती होणार? कोण बंडखोरीचा मार्ग स्वीकारणार? आणि कोण उमेदवार अधिकृत तिकिटावर उभा राहणार? या चर्चांना सध्या जोर चढला आहे.
काही उमेदवारांनी प्रचाराचे शंखनाद करत जनसंपर्क मोहिम सुरू केली आहे, तर काहींनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आपला दावा अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी तालुक्यातील राजकीय वातावरण मात्र आचारसंहितेपूर्वीच तापले आहे.
गावोगाव चर्चेचा एकच विषय — “या वेळी कोणाला संधी मिळणार?” हा असून इंदापूर तालुक्यातील काटी–लाखेवाडी गटात सध्या सुरू असलेली ही राजकीय चाचपणी आणि कार्यकर्त्यांची धडपड पाहता, आगामी निवडणूक ही नक्कीच चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार हे निश्चित आहे.
©2026. All Rights Reserved.