शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा - भिमा सहकारी साखर कारखान्याकडून चालू हंगामातील १६ ते ३० नोव्हेंबर या दुसऱ्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ऊस बिलाचा पहिला हप्ता विनाकपात प्रती टन ३ हजार १०१ रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोमवारी (दि.१५) जमा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात उच्चांकी उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १ ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यातील ऊस बिलही याच दराने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या पंधरवड्याची रक्कमही वेळेत जमा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चालू हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असून, सध्या प्रतिदिन ५,७०० ते ६,००० टनाच्या क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे. सोमवार (दि.१५)अ खेर कारखान्याने एकूण २ लाख ६४ हजार ७८२ टन ऊसाचे गाळप पूर्ण केले असल्याची माहिती अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी-वाहतूक कंत्राटदार, अधिकारी-कर्मचारी व हितचिंतकांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या की, कारखान्याकडून शेतकऱ्यांचा सर्व ऊस गाळप करण्यात येणार असून गाळपाअभावी एकही ऊसाचे टिपरू शिल्लक राहणार नाही. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये. शेतकी विभागाकडून शिस्तबद्ध पद्धतीने ऊस तोडणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या गुणवत्तेचा ऊस पुरवठा केल्यास भविष्यात अधिकचा ऊस दर देणे शक्य होईल. तसेच ऊस उत्पादन वाढीसाठी अधिक क्षेत्रावर ऊस लागवड करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ॲड. कृष्णा यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे तसेच कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.
©2026. All Rights Reserved.