पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी माळेगाव पोलीस ठाण्याने केली आहे. सुमारे ४ लाख ११ हजार रुपये किंमतीचे एकूण १८ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली हरविलेल्या मौल्यवान वस्तूंचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गोपनीय शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांना प्राप्त तक्रारींचे तांत्रिक विश्लेषण करून मोबाईलचा शोध घेण्याची जबाबदारी दिली होती.
या तपासादरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात यश आले. त्यामध्ये सांगवी येथील जयदीप कदम यांचा सुमारे १ लाख १८ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रा, तसेच राजवर्धन कुमार, शंकर पवार, कल्याण जाधव, गजानन कानडे, निलेश जगताप, अक्षय कुतवळ, पूर्वा खारतोडे, सुप्रिया खलाटे, रतन पवार आदींसह अनेक नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल समाविष्ट आहेत.
शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) तक्रार निवारण दिनानिमित्त हे सर्व मोबाईल संबंधित मालकांना परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत माळेगाव पोलिसांचे आभार मानले.
माळेगाव पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी नागरिकांचे २० लाख २२ हजार रुपये किंमतीचे एकूण १०७ हरवलेले मोबाईल शोधून संबंधितांना परत दिले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून माळेगाव पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
©2026. All Rights Reserved.