बारामतीच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘पुढील पिढी’ या विषयावर जोरदार चर्चा रंगू लागली असून, त्यात आता युवा नेते जय पवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामुळे नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत विक्रमी विजय मिळवल्यानंतर बारामतीतील राजकारण अधिकच तापले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता जय पवार लोकांच्या अडचणी थेट ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी पुढे येत असल्याने त्यांच्या सक्रियतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या जनता दरबाराचे आयोजन उद्या गुरुवारी (दि. ७ मे) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत बारामतीतील सहयोग निवासस्थानात केले आहे. या जनता दरबारातून जय पवार थेट नागरिकांशी संवाद साधणार असून, स्थानिक प्रश्न, तक्रारी आणि विकासकामांबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवला. या निकालाने बारामती अजित पवारांच्या विचारसरणीवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
जय पवारांचा जनता दरबार हा केवळ जनसंपर्क उपक्रम आहे की २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून जय पवारांना लोकांमध्ये सक्रिय ठेवण्याची रणनीती आखली जात आहे का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
एकूणच, बारामतीत आता ‘पुढील पिढी’ सक्रिय होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. जय पवारांचा हा जनता दरबार केवळ स्थानिक समस्यांपुरता मर्यादित राहतो की मोठ्या राजकीय समीकरणांना दिशा देतो, हे येणारा काळच ठरवणार आहे.
©2026. All Rights Reserved.