बावडा परिसरातील घरकुल लाभार्थी आणि भूमिहीन नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. ग्रामपंचायत बावडा येथील तब्बल १३२ घरकुल लाभार्थी व भूमिहीन नागरिकांना गायरान जमीन उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध घरकुल योजनांमध्ये अनेक लाभार्थ्यांची निवड झाली होती. मात्र स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे अनेक कुटुंबांना घर बांधकाम सुरू करता येत नव्हते. परिणामी अनेक गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि भूमिहीन कुटुंबांचे घराचे स्वप्न केवळ कागदावरच राहिले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत अंकिता पाटील ठाकरे यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेत सातत्याने पाठपुरावा केला. तसेच बारामती उपविभागीय अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा करण्यात आला.
गायरान जमीन उपलब्ध करून देण्यासाठी अनेक बैठका, चर्चा तसेच प्रशासकीय स्तरावरील आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यांच्या या लोकाभिमुख आणि सकारात्मक भूमिकेमुळे प्रशासनाने विषयाला गती देत संबंधित लाभार्थ्यांसाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १३२ कुटुंबांना स्वतःचे घर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे अनेक भूमिहीन आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण होणार असून सुरक्षित निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम करताना अंकिता ताईंनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता नागरिकांमध्ये विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी बावडा गावातील बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांना गायरान जागा मिळावी म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
या कामासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य लाभल्याचे अंकिता पाटील - ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी लाभार्थी नागरिकांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “घरकुल मंजूर होऊनही जागेअभावी आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अंकिता ताईंनी आमच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आमचे स्वतःच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.”
©2026. All Rights Reserved.