थोपटेवाडी गावात रस्त्याच्या कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन फुटल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. संतप्त नागरिक व महिला भगिनींनी बारामती पंचायत समिती येथे निवेदन देत पाणीपुरवठा तात्काळ सुरू न झाल्यास ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला तातडीने भेट देत परिस्थितीची पाहणी केली. भर उन्हात मुख्य रस्त्यावर उभे राहून त्यांनी फुटलेल्या पाइपलाईनची पाहणी केली तसेच नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी सरपंच रेखा बनकर, ग्रामसेविका वर्षा सालगुडे व ग्रामपंचायत सदस्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
सभापती तावरे यांनी गावात एकोपा व सलोखा टिकवून ठेवत सर्वांना समान न्याय मिळावा, यावर भर दिला. पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवीन विहीर व बोरवेल उभारण्याच्या सूचना देत पंचायत समितीमार्फतही बोरवेल मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेस निधी कमी पडल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून अतिरिक्त निधी मिळवण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित नागरिकांनी पाणी व मूलभूत सुविधांबाबत विविध प्रश्न उपस्थित करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. सभापतींनी तातडीने भेट दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, सरपंच रेखा बनकर, ग्रामसेविका वर्षा सालगुडे तसेच अजय पिसाळ, प्रमोद पानसरे, सुधीर यादव, शशिकांत पानसरे, वैशाली धोत्रे, मोहन वाल्हेक, ज्ञानदेव लष्कर, लक्ष्मण चौगुले, जगन्नाथ पिसाळ, आनंद लष्कर, सचिन कांबळे, करण साबळे, हरीष कदम आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
©2026. All Rights Reserved.