बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बारामती ग्रामीणपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यभर व्यसनमुक्त आणि निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा दिली. व्यसनाचे दुष्परिणाम, मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच कुटुंब आणि समाजावर होणारा विपरीत परिणाम यांचे त्यांनी प्रभावी विवेचन केले.
व्यसनामुळे मानसिक आरोग्य बिघडते, हृदयरोग, नैराश्य, तणाव यांसारख्या समस्या वाढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या व्यसनांच्या आहारी जाऊ नये आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन यादव यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी आनंदी राहण्यासाठी शरीरातील डोपामाईन, सिरेटोनिन, ऑक्सिटोसिन आणि इंडॉर्फिन या ‘हॅपी हार्मोन्सला’ सक्रिय ठेवावे व व्यसनाशिवायही जीवनात आनंद मिळवता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपप्राचार्य प्रा. अंकुश खोत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आयुष्यातील शिस्तीचे महत्व पटवून देत शिस्त पाळण्याचे आवाहन केले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय डॉ. भिमराव मोरे यांनी तर प्रस्ताविक नोडल अधिकारी प्रा. विजय काकडे यांनी केले. आभार प्रदर्शनाचे काम प्रा. ज्योती जगताप यांनी पाहिले. कार्यक्रमाला २५० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
©2026. All Rights Reserved.