बारामती शहरातील भिगवण रोडवर सोमवारी (दि.२२) दुपारी अज्ञात चोरट्यांनी चारचाकी गाडीची काच फोडून तब्बल तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
संपत सोपान शिंगाडे (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोमवारी त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून तीन लाख रुपये काढले होते. रोकड गाडीत ठेवून ते खरेदीसाठी दुकानात गेले असताना चोरट्यांनी संधी साधून गाडीची काच फोडली व रोकड लंपास केली.
घरी परत आल्यानंतर काच फुटलेली व रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. प्राथमिक तपासात चोरटे परिसरात सक्रिय असल्याचे दिसत असून, याआधीही अशाच पद्धतीने रोकड चोरीचे प्रकार घडले आहेत.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
©2026. All Rights Reserved.