धनादेश (चेक) न वटल्याप्रकरणी बारामती न्यायालयाने एका आरोपीस चार महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय फिर्यादीस देय रक्कम परतफेड करण्याचे आदेशही देण्यात आले असून, ती रक्कम न दिल्यास आरोपीस आणखी एका महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
फिर्यादी अक्षय दुधाळ (रा. मदनवाडी, ता. इंदापूर) व आरोपी विकास काळे (रा. एमआयडीसी बारामती) यांच्यात २०१७ मध्ये प्लॉट खरेदीचा व्यवहार झाला होता. या व्यवहारासाठी फिर्यादीने आरोपीस २ लाख ५० हजारांचा विसार दिले होते. मात्र, पुढील चौकशीत सदर प्लॉट दुसऱ्यालाच विक्री केल्याचे उघड झाल्याने फिर्यादीने आरोपीकडे पैसे परत मागितले. त्यासाठी आरोपीने भारतीय स्टेट बँकेचा चेक दिला होता. परंतु खात्यातील अपुऱ्या शिल्लक रकमेअभावी तो चेक न वटल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली.
सदर खटल्यातील साक्षीपुराव्यावर विश्वास ठेवून बारामती येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रशांत काळे यांनी शनिवारी (दि. २०) दिलेल्या निकालानुसार आरोपी दोषी ठरला. न्यायालयाने आरोपीस चार महिन्यांचा सश्रम कारावास व फिर्यादीस परतफेड म्हणून २ लाख ५० हजार रुपये दंड देण्याचे आदेश दिले. रक्कम न दिल्यास आरोपीस आणखी एका महिन्याची शिक्षा भोगावी लागेल, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
फिर्यादी अक्षय दुधाळ यांच्यावतीने ॲड. पांडुरंग जगताप, ॲड. प्रणव लोदाडे, ॲड. ज्योती जगताप व ॲड. राहुल गवंड यांनी काम पाहिले.
©2026. All Rights Reserved.