सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित वरिष्ठ महाविद्यालयीन मुलींची आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा नुकतीच पिंपरी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्हाभरातील तसेच विद्यापीठाशी संलग्न अनेक नामांकित महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ कौशल्य, संघभावना आणि चिकाटीच्या जोरावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात बारामतीच्या मुलींनी प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवत निर्णायक विजय मिळविला आणि महाविद्यालयाचा मान उंचावला.
या विजयी संघात कर्णधार सृष्टी मोरे (TYBA), पूजा तोंडे (TYBA), तेजश्री चौगुले (TYBA), प्रिया निबाळकर (SYBA), अमृता हिवरे (SYBA), ऋतुजा कुचेकर (SYBA), कोमल महाजन (FYBSc), सानिया पटेल (FYBA), वैष्णवी राऊत (M.Sc. Zoology), शारदा होले (TYBCom) यांचा सहभाग होता. विजयी संघाला महाविद्यालयातील क्रिडा संचालक डॉ. दिनेश सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत शिंदे, तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थीवर्ग यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. या उल्लेखनीय विजयामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून खेळाडूंनी भविष्यात विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
©2026. All Rights Reserved.